शशांक मनोहर देशपांडे
पुणे
कर्करोग नि:पातासाठी
सकारात्मकतेची ताकदआला आला कर्करोग रुपी शत्रू आला,
बेसावध असतांना उजवी किडनी घेऊनी गेला ।।(१/२०१२)
ना खचलो ना डगमगलो, सकारात्मकतेच्या ऊर्जेने जीवन जगण्या पुन्हा सज्ज झालो ।।
गेला कसला दबा धरून ९ वर्षे शरीरातच लपला,
नऊ वर्षांनी कळले तेव्हा घरं संख्या पोहचली चाराला ।।(३/२०२१)(डी५-डी६, फुफ्फुस, स्वादुपिंड शेपटी, अधिवृक्क ग्रंथी )
सकारात्मकता व आत्मविश्वास ढळू दिला नाही,
शत्रूला घालविण्यासाठी काहीच कसूर ठेवली नाही ।
अजून दोन घरे (नाकावर, ढोपर) करुन हुलकवण्या देत राहिला सततच्या गोळ्यांच्या माराला,
न घाबरता कमी होऊ दिले नाही सकारात्मकतेला ।।
त्यालाही वाटले सर्वांनी माझ्याकडे लक्ष द्यावे,
गाल व नाक ह्यांच्या आधाराने दर्शनी भागात रहावे।
इथे मात्र डॉ.कोठावडेंच्या निपुणतेचा कस लागला,
कारण वाचवायचे होते डोळा व नाकाला,
नक्कीच तो जाणार असा दिला आत्मविश्वास त्यांनी,
खरंच समूळ गेला की हो दीड वर्षांनी ।।
सत्कर्म करणारा हातही आवडला,
ढोपरा मध्ये दोनदा वस्तीला आला,
चारवेळच्या रेडिएशन माराने धारातीर्थी पडला ।।
त्याला हरविण्याचा जणू चंगच बांधला डॉ मेखांनी,
नोवोलुमॅबरुपी (इंजेक्शनचा) आधुनिक (ब्रह्म)अस्त्रांचा मारा वर्षभर करुनी।।
गरजेच्या वेळी घेऊनी रेडिएशनची मदत
केले शत्रुला चारी मुंड्या चित ।। (२०२१-डिसें२०२२)
धुंदी यशाची टिकली वर्ष भराला,
जोडूनी सैन्य आला थेट नियंत्रण कक्षाला (मेंदू)।।(१/२०२३)
आणीबाणीचा बाका प्रसंग डॉ मेखांनी ओळखला,
गनिमी कावा (SRS) कौशल्याने वापरून,
खिंडीतच त्याला डॉ. कोठावडेंनी निपचित केला।।
तीन वर्षांच्या खडतर प्रवासातील दुष्परिणामांचे,
डॉ राजहंस व डॉ.द्वयांनी मोलाचे कार्य केले निर्दालनाचे।।
पुन्हश्च त्याचा उपद्रव होवू नये म्हणूनी,
ब्रह्मास्त्राचा वर्षभर मारा चालूच ठेवूनी ।
दिली शत्रूला तिलांजली अध्वर्यू डॉ. मेखांनी।। (२०२३-डिसें.२४)
हा खडतर प्रवास झाला तीन वर्षांचा, मिलेट अन्नाचा, कुटुंबियांचा, आप्तस्वकीयांचा साथ ठरला मोलाचा।।
मनोधैर्य उच्च ठेवण्याचे श्रेय सहचरणी आणि मुलांसह, कौटुंबिक डॉक्टर तथा मित्र डॉ. राजहंस ह्यांचेच।।
वेळोवेळी करुनी मार्गदर्शन, धैर्य टिकवीत सद्गुरु,
कायम त्यांची सोबत हेच खरे सकारात्मकतेचे गमक।।
सावध राहून सकारात्मक आत्मविश्वासाने शत्रूस सर्वांच्या मदतीने हारविला ।
अशा प्रकारे आलेला आगंतुक कर्करोगरुपी शत्रू गेला शत्रू गेला ।।


