डॉ. वंदना कुलकर्णी घोडके
पुणे
आज डोकं खाजत होत
जरासा कोंडाही पडत होता
म्हणून सहजच तीने कंगव्याने विंचरले.....आणि तिच्या लक्षात आले की
आज कित्येक महिन्यानंतर डोक्याला कंगवा लागला होता
किंबहुना हातातच खूप महिन्यांनी धरला होता
इतरांसाठी ही छोटीशी गोष्ट होऊ शकते पण
तिच्यासाठी....
कॅन्सरच्या ट्रिटमेंटमुळे गेलेले केस आता थोडे-थोडे परत यायला सुरूवात झाली होती....
डॉ. वंदना कुलकर्णी घोडके स्वतः व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे आता पन्नाशी पर्दापण करणार म्हणून तीने आरोग्य तपासणीचा मुहूर्त काढला १ एप्रिल २०२१ आणि चक्क एप्रिल फुल झाल्यासारखं झाल आणि वंदनाला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला.
काहीही त्रास नसताना सोनोग्राफी मध्ये १.८ सेंटीमीटरची गाठ स्तनामध्ये दिसली. कॅन्सर आहे हे समजल्यानंतर ती शांतपणे बसली. स्वतः डॉक्टर असल्यामुळे खूप काही घाबरायला झाल नाही. भरपूर पेशंट बघत बाबतीत जेव्हा घडलं तेव्हा चला बघता येईल जे असेल ते असा विचार करुन तीने दोन तीन जिवाभावाच्या.
मैत्रिणींना फोन करुन चर्चा केली आणि दुसऱ्या दिवशी पुढील तपासण्या करण्यासाठी दवाखाना गाठला. बायोप्सी, स्कॅन झाला, इतर काही रक्ताच्या तपासण्या झाल्या. BRCA स्कोअर ९५% होता. त्यामुळे कॅन्सर असेल हेच अंतिम सत्य होत. नवरा घरी नव्हता, मुलगी आजारी होती आणि मुलाचे दहावीचे वर्षे होत आणि मुळात रडत बसण्याचा तिचा स्वभाव नसल्या कारणाने, आहे ते स्विकारुन पुढे जायचं ठरवलं. थोड पहिल्या दिवशी भरुन आलं पण मैत्रिणी सोडून कुणालाही तीने सांगितली नाही. नंतर नवरा आल्यावर ऑपरेशनच्या आधीचे काही टेस्ट करुन ऑपरेशन करायला असल्यामुळे हे स्वतःच्या ती तयार झाली. आई - वडिलांना सांगणे थोडं अवघड होतं पण तेही काम तिने व्यवस्थित केलं आणि ऑपरेशन झालही.
घरातल्यांना या आजाराची काठीण्यपातळी कळूच न दिल्यामुळे बाकी काही विशेष असा मनावरती ताण नव्हता. घरात तीच्या नवऱ्याला फक्त सगळया गोष्टी माहित होत्या. त्यानंतर किमोथेरपी सुरू झाली. १६ केमो डॉक्टरांनी सुचवलेल्या होत्या. त्यामध्ये पोर्टला इनफेक्शन आणि सिरोमा कॅविटीचा विषय थोडा गुंतागुंतीचा झाला. त्याव्यतिरिक्त किमोथेरेपीचा संभाव्य त्रासाशिवाय इतर काही त्रास तिला झाला नाही.
केमोथेरेपी मध्ये काही आयुर्वेदिक औषध तिने अँसिडिटी वगैरेचा त्रास न होण्यासाठी घेतली होती. या सगळया उपचारादरम्यान ती अगदी तलवार घेऊन लढत होती. वंदना म्हणते की, काहीही फॅमिली हिस्ट्री नाही, दोन मुलं, दोन्हीही नॉर्मल डिलेव्हरी, दोन मुलांना दीड दीड वर्ष ब्रेस्ट फिडींग म्हणजे कॅन्सर व्हावा अस कुठलचं कारण नव्हतं. कॅन्सर का झाला हा प्रश्न मात्र गुलदस्त्यातच आहे.
नंतर रेडीएशन सुद्धा निभावून नेले. सिरोमा कॅव्हीटीचा त्रास होत होता. पण त्याला पर्याय नव्हता. अलीकडेच फॉलोअप साठी गेल्यानंतर सोनोग्राफी मध्ये लिव्हरवरती लिजन दिसलं. दोन वेळा केलेला पेटस्कॅन निगेटीव्ह अ आला. त्यामुळे डॉक्टर म्हणाले काही काळजी करु नकोस. पण मन मानत नव्हतं, बायोप्सी केली आणि वंदनाला पुन्हा एकदा लिव्हरशी संदर्भात कॅन्सर डिटेक्ट झालाय. पुन्हा ती तलवार घेऊन लढायला सिद्ध आहे. केमोथेरेपी आणि टारगेटेड थेरेपी अशी उपचार पद्धती ठरली आहे. उपचार सध्या सुरू आहेत.
वंदना म्हणते, एक डॉक्टर म्हणून पॉझिटीव्ह रहा सांगणे आणि स्वतः पेशंटच्या जागी गेल्यानंतर स्वतःला पॉझिटीव्ह रहा म्हणण तस अवघड आहे. पण पुर्ण ट्रिटमेंट मध्ये तीने स्वतःच स्वतःला समजावलं आणि उपचार घेतले. आजही ती तेवढीच खंबीरपणे आजाराला सामोरी जात आहे.
एक मजेशीर गोष्ट वंदना सांगते की, मागच्या ट्रिटमेंट नंतर आठ पंधरा दिवसातच उपचारादरम्यान झालेला त्रास ती विसरूनही गेली होती. जणू शरीर तिला म्हणत होतं डोक्यातून काढून टाक आता सगळं आणि गंमत बघा की यावेळी दोन वेळा पेटस्कॅन करुन जेव्हा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तरीही शरीरच सांगत होत की, नाही काहीतरी वेगळं घडतयं शरीरामध्ये त्यामुळे शरीराचा आवाज ओळखा...


