आशा नेगी
स्वारगेट
फेब्रुवारी 2023 मध्ये मला अग्रेसिव्ह थर्ड स्टेज 'ब्रेस्ट कॅन्सर' डिटेक्ट झाला.
कॅन्सर हा शब्द स्वतःसाठी ऐकणं आणि पचवणं हे सोप्पं नसतं. माझा कॅन्सर हा ' अग्रेसिव्ह कॅन्सर मध्ये मोडणारा होता म्हणजे फास्ट ग्रोथ होणारा. सुरुवातीला जेंव्हा मला समजले की मला कॅन्सर झालाय.. तेंव्हा मला खरंच वाटलं नाही . कारण मी अगदी सो कॉल्ड 'फिट कॅटेगिरी' मध्ये मोडणारी, नियमित योगा, व्यायाम करणारी, जेवणाच्या सवयी काटेकोरपणे पाळणारी. पण नंतर मला असे लक्षात आले की कॅन्सर कुणालाही होऊ शकतो. कारण सध्याची आपली "लाइफस्टाइल", भेसळयुक्त "भाज्या", "फळ" "अन्नधान्य", "दूध व दुधाचे प्रॉडक्ट" या सर्व प्रकारांमध्ये, सर्व गोष्टीत केमिकल आहेत. आणि ह्या सर्वांवर उपाय आपण करणार तरी किती? आणि कसे?. या काही गोष्टी आपल्या हातात नाहीयेत. एखादा आजार आपल्याला होणे न होणे हे देखील आपल्या हातात नाहीये. पण आपल्या हातात या दोन गोष्टी निश्चितच आहेत, त्या म्हणजे
- आपल शरीर तंदुरुस्त ठेवणे.
- मानसिकरित्या स्ट्रॉंग राहणे.
कारण अशा एखाद्या आजाराशी सामोरे जाताना, तुम्ही शरीराने आणि मनाने सुद्धा स्ट्रॉंग असले पाहिजे. सगळ्यात आधी 'आपल्याला कॅन्सर झालाय' हे स्वीकारलं पाहिजे. कारण बऱ्याच वेळा एखादी गोष्ट स्वीकारण्यातच आपण वेळ घालवतो, त्याच्यामुळे पुढील उपचारासाठी उशीर झालेला असतो.
सर्वात आधी मी माझ्या मनाला स्ट्रॉंग मेसेज पाठवला, थोडाफार त्रास होणारच आहे, आणि तो आपल्याला सहन करावा लागेल. तुम्हाला खरं सांगू, जेंव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी मनाने आणि शरीराने तयार होतो, त्याच्या नंतरचा त्रास गौन असतो. मी माझी पूर्ण ट्रीटमेंट, संपूर्ण कॅन्सरचा प्रवास एन्जॉय केला. हो खरंच, मी माझी पूर्ण ट्रीटमेंट एन्जॉय केली. ऑपरेशन, रेडिएशन आणि केमो सुद्धा. विचार केला जर एखादी गोष्ट करावीच लागणार आहे तर, ती रडत का करायची? ती हसत का नाही करायची. एकच ठरवलं
"रडायचं नाही, आता लढायचं"
कॅन्सरच्या ट्रीटमेंट मध्ये डोक्यावरील केस जातात हे सगळ्यांनाच माहिती आहे. माझी पहिली केमो झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर माझे केस गळायला लागले. नंतर मी स्वतः सलूनमध्ये जाऊन केस शेव्ह करून आले. आरशात स्वतःला बघितलं आणि म्हटलं, "नॉट बॅड" या लुक मध्ये पण मी छान दिसतिये. तसही मी आयुष्यात परत कधी केस काढणार नाहीये, स्वतःला पुन्हा या रूपात पाहू शकणार नाही. तर आपण हा लुक सुद्धा एन्जॉय करूया. प्रत्येक गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेण्याची ठरवली.
आत्तापर्यंत मी लोकांचे अनुभव ऐकले होते. केमो मध्ये असं होतं, केमो मध्ये तस होत, केमो मध्ये खूप त्रास होतो. तसे पाहिले तर दोन दिवस साधा ताप आल्यावर सुद्धा आपल्याला विकनेस येतो, त्रास होतोच ना? आणि तसंही आपण बायका 'इनबिल्ड स्ट्रॉंग' असतोस की? पिरिएड, प्रेग्नेंसी ह्याच्यात काय कमी त्रास होतो, मंग घाबरायचं कशाला? मी सुरुवातीलाच ठरवलं होतं, स्वतःचे रुटीन लाईफ बदलायचं नाही. ऑफिस असेल, सण असतील, मुलांचे वाढदिवस असतील त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवून टाकले. माझ्या पूर्ण ट्रीटमेंटच्या दरम्यान सिनेमेही पाहिले. आणि ह्या सगळ्यांबरोबरच माझी खाण्यापिण्याचे पथ्य पाणी याकडे ही व्यवस्थित लक्ष दिलं. माझ्या ट्रीटमेंटमध्ये मी वॉकिंग, योगा करत होते. केमो नंतर थोडा विकनेस येतो, त्यावेळेस मी घरी पाच ते सहा दिवस आराम करत होते. स्वतःचा डाएट व्यवस्थित पाळत होते. आणि परत पुढच्या केमोसाठी तयार होत होते. मनाने तर ही लढाई पहिल्याच दिवशीच जिंकले होते आणि शरीराने सुद्धा मला साथ दिली.
ह्या प्रवासातून मी एक शिकले, आयुष्य हे अनपेक्षित आहे. कधी काय होईल सांगता येणार नाही, काही गोष्टी आपल्या हातात आहेत. तर काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. पण 'आनंदी राहणं, भरभरून जगणं' आणि स्वतःसाठी ठाम उभे राहणं तर आपल्या हातात आहेच ना?
फेब्रुवारी 2023 मध्ये मला अग्रेसिव्ह थर्ड स्टेज कॅन्सर डिटेक्ट झाला.. 2025 मध्ये मी क्रिकेट खेळतीये. स्वतःचा बिझनेस पाहतीये..
माझ्या कॅन्सर जर्नीवर "ब्युटी ऑफ लाईफ" पुस्तक लिहिलं. अवघ्या चार महिन्यात पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली पुस्तकाला "पाच राज्यस्तरीय" पुरस्कार जाहीर झाले. आलेल्या अनुभवांचा कॅन्सर फायटरला फायदा व्हावा म्हणून मी कॅन्सर अवेअरनेस साठी काम करतीये. केमो रेडिएशन भीती, गैरसमज पेशंटच्या मनातून घालवते...
कॅन्सर पेशंटला मला एकच सांगायचं..आयुष्यात आलेल्या समस्या तुम्हाला कणखर बनवतात..तुमचा दृष्टिकोन तसा पॉझिटिव्ह हवा. मला कॅन्सर झाला याचा मला काडी मात्र दुःख नाहीये कारण कॅन्सरने मला खूप काही शिकवलं, खूप काही दिलं. आणि शिकवणाऱ्या गोष्टी कधीच वाईट नसतात...
कॅन्सर म्हणजे आयुष्य कॅन्सल नव्हे हे लक्षात ठेवा..


